Ad will apear here
Next
वैभवशाली साताऱ्याची सफर : भाग एक
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या दोन भागांत आपण सांगली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजपासून पाहू या सातारा जिल्हा...
.........
पूर्वी सांगलीला दक्षिण सातारा जिल्हा असे नाव होते. सातारा जिल्ह्याच्या सांगलीच्या वायव्य सीमेवरील भागाची माहिती सुरुवातीला घेऊ. या भागावर पूर्वी सातवाहन, मौर्य, चालुक्य यांची सत्ता होती. बाराव्या शतकात शिलाहार राजवटीची सत्ता होती. शिलाहारांची सत्ता महादेवाच्या डोंगरापर्यंत होती. या डोंगरातील वाईजवळील केंजळगड त्यांनी बांधला. बौद्धकालीन गुंफा या जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. साधारण इसवी सन १२०० ते १३००या दरम्यान दिल्लीच्या सुलतानाची राजवट या भागात आली. काही काळ बहामनी, काही काळ मुघल, त्यानंतर मराठे आणि अखेर ब्रिटिश अशा राजवटी येथे येऊन गेल्या. सातारा जिल्हा पूर्वी व आताही भारती राजकारणाचे एक प्रमुख केंद्र राहिले आहे. पूर्वी दिल्लीच्या सुलतानशाहीबरोबर लढताना आणि ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढ्यात सातारा अग्रेसर राहिला. सप्तसरितांनी (कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना, नीरा, येरळा, माणगंगा) समृद्ध केलेला हा जिल्हा आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाने संपूर्ण देशात मानाचे स्थान मिळविले आहे. इतिहासात मावळ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा सातारा जिल्हा आजही सैन्यभरतीत अग्रेसर आहे. अनेक गावे स्वातंत्र्यसैनिकांची गावे, मिलिटरी गावे म्हणूनच ओळखली जातात. या जिल्ह्यात २० हजारांहून अधिक माजी सैनिक आहेत. 

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे शिल्पकार ठरले आणि देशपातळीवरही महत्त्वाचे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले, आगरकर यांसारखे विचारवंत, त्याचबरोबर नाटककार, अभिनेते, कवी, लेखक, उद्योजक या भूमीत जन्माला आले. औद्योगिक, शैक्षणिक, कृषी, पर्यटन या क्षेत्रांत जिल्ह्याने नाव कमावले आहे. इतिहास, धार्मिक स्थळे, सुंदर मंदिरे, किल्ले, अनेक ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये आणि निसर्ग यांमुळे पर्यटन पावसाळा, उन्हाळा आणि थंडीमध्येही बहरात येते. पर्यटनात अग्रेसर असलेल्या या जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात ठिकाणाची माहिती यापुढील दोन-तीन भागांत देण्याचा माझा प्रयत्न राहील. मी साताऱ्यातीलच असल्याने अधिकाधिक माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल.

सातारा शहर : सातारी कंदी पेढ्याप्रमाणे गोड असलेले सातारा शहर अजिंक्यताऱ्याच्या उत्तर बाजूच्या उतारावर वसले आहे, पश्चिमेस येवतेश्वर, वायव्य कोपऱ्यात मेरुलिंग, उत्तरेस चंदन वंदन, ईशान्य कोपऱ्यात जरंडेश्वर, पूर्वेस क्षेत्र माहुली-त्रिपुटी, नैर्ऋत्येस पाटेश्वर व दक्षिणेस पाठराखण करणारा अजिंक्यतारा यांच्या मध्यभागी सातारा शोभून दिसतो. गावाच्या उत्तरेला वेण्णा, पूर्वेला कृष्णा आणि दक्षिणेस उरमोडी नदी वाहते. या तिन्ही नद्या साताऱ्याला पाण्याचे दुर्भिक्ष्य कधीही भासू देत नाहीत. रात्रीच्या वेळी लिंबखिंड, शिवथर, त्रिपुटीखिंड यातून दिव्याने उजळलेला सातारा खूपच छान दिसतो. छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुमारे १८ पेठा या गावात वसविल्या गेल्या. राजधानीचे गाव असल्याने अनेक ठिकाणच्या सरदारांनी, जहागीरदारानी आपले वाडे येथे बांधले. त्यांच्या बरोबरीने येणाऱ्या लोकांसाठी पंताचे गोटासारख्या पेठाही वसल्या. त्यातील बरेच ठिकाणी आता सहनिवास संकुल संस्कृती रुजली आहे. 

सातारा शहराने बाळ कोल्हटकर, श्रीराम लागू यांच्यासारखे अभिनेते दिले. बाळ कोल्हटकर स्वतः नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व कवी होते. रंगो बापूजी गुप्ते यांच्यासारखे क्रांतिकारक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धावपटू नंदा जाधव, श्रीरंग पैलावांसारखे मल्ल, चिरमुले यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ, भाऊकाका गोडबोले यांच्यासारखे समाजधुरीण, कबड्डीपटू, नरेंद्र दाभोळकर यांच्यासारखे विचारवंत, मल्लविद्या शिकविणारे भिडे गुरुजी, शिल्पकार, नखचित्रकार माजी आमदार खंडेराव सावंत, शाहीर फरांदे, साहित्यिक यु. म. पठाण, प्रा. शिवाजीराव भोसले, पहिली लोको ऑपरेटर सुरेखा भोसले-यादव अशा अनेक दिग्गज व्यक्ती याच मातीत घडल्या. ही यादी खूप मोठी आहे.

नवीन राजवाड्याचे  २०० वर्षांपूर्वी काढलेले संकल्पचित्र

इंग्रजांशी तह झाल्यावर एल्फिन्स्टनने ग्रांट डफ या मुत्सद्दी रेसिडेंटची सातारा येथे नेमणूक केली. त्याच्या सहकार्याने प्रतापसिंह महाराजांनी गावात व कारभारात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी शहरात नव्या राजवाड्यासारख्या अनेक वास्तू निर्माण झाल्या. शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले गेले. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा काढण्यात आली. त्या माध्यमातून संस्कृत-मराठीबरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन देण्यात आले. छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ त्यांनी छापून घेतले. सातारा-पुणे व सातारा-महाबळेश्वर या रस्त्याचे कामही याच काळात झाले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती. ग्रांट डफ हा स्वतः इतिहास संशोधक होता. त्याने मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे लेखन केले. त्याचे चार वर्षे सातारा येथे वास्तव्य होते. प्रतापसिंह महाराजांशी त्याचे स्नेहसंबंध होते. तो पोवई नाक्यावर राहत होता. तो सातारा सोडून गेल्यावर इंग्रजांनी महाराजांना खूप वाईट वागणूक दिली. त्यांचे वाराणसी येथे स्थानबद्धतेत निधन झाले. 

साताऱ्याची ओळख आता विद्यानगरी म्हणूनही झाली आहे. येथे कला, वाणिज्य, विधी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन, स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत, आटोमोबाइल, अध्यापन, औषधनिर्माण शास्त्र, आयुर्वेद, होमिओपॅथी, सीए, सीएस अशा बहुविध प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होत असून, कृष्णानगर येथे नुकतीच जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

जुना राजवाडा

साताऱ्यातील ऐतिहासिक स्थळे :
राजवाडा : साधारण १८२४च्या सुमारास दोन मजली राजवाड्याची निर्मिती झाली. १८५१पासून येथे न्यायालयीन कामकाज सुरू झाले. येथील दरबार हॉल अतिशय सुंदर आहे. उंच छत, तसेच भक्कम लाकडी खांब, बाजूने कारंजी, फरसबंदी, भव्य पटांगण, उंच दगडी जोती, दोन भव्य प्रवेशद्वारे हे याचे वैशिष्ट्य. याकडे शासनाचे लक्ष नाही. येथे सुंदर पर्यटनकेंद्र विकसित होऊ शकते. वाड्याच्या प्रवेशद्वारापुढे भव्य गांधी मैदान असून, येथे अनेक सभा होतात. 

राजवाडा दरबार हॉल

जुना राजवाडा :
छत्रपती प्रतापसिंह महाराज (पहिले) यांनी हा वाडा बांधला. सध्या या वाड्यात जिल्हा परिषदेचे प्रतापसिंह हायस्कूल सुरू आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले. 

फाशीचा वड

फाशीचा वड :
१८५७च्या उठावात भाग घेतलेल्या क्रांतिकारकांना गेंडामाळ परिसरात फाशीची शिक्षा देण्यात आली. काहींना तोफेच्या तोंडी देण्यात आले, तर काहींना गोळ्या घालून मारण्यात आले. यात सीताराम गुप्ते, विठ्ठल वाकनीस, केशव चित्रे, नारायण पावसकर, शिवराम कुलकर्णी यांचा समावेश होता. या ठिकाणी दर वर्षी १५ ऑगस्टला शहीदांना मानवंदना देण्यात येते. येथे स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. जुने वडाचे झाड उन्मळून पडल्याने त्या जागी नवीन झाड लावण्यात आले आहे. 

अदालतवाडा : माचीवर अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी हा वाडा आहे. येथे न्यायदानाचे काम होत असे. येथे राजघराण्यातील शिवाजीराजे राहतात. 

बेगम मशीद : औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसाच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी अदालतवाड्याच्या जवळच एक मशीद बांधली. शाहू महाराज इतर धर्मीयांचाही आदर करीत असत. त्यामुळे अनेक मशिदींची उभारणी झाली. 

धनिणीची बाग : शाहू महाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचा वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध असून, तेथे रयत शिक्षण संस्थेचे वसतिगृह व शाळा आहे. दुष्काळग्रस्त भागातील मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये, म्हणून तेथील विद्यार्थ्यांना संस्थेने राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था केली आहे. यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान घेतले जात नाही. 

जलमंदिर भवानी मंदिर

जलमंदिर :
येथे सध्या छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे व कुटुंबीय रहातात. येथील भवानी मंदिरात भवानी तलवार ठेवलेली आहे. ती फक्त दसऱ्याच्या दिवशी मिरवणुकीने पोवई नाक्यावर आणली जाते व तेथे तिची पूजा केली जाते

भवानी तलवारीचे पूजन करताना उदयनराजे भोसले

सुरुची बंगला :
येथे दिवंगत अभयसिंह महाराज यांचे पुत्र शिवेंद्रसिंह महाराज कुटुंबीयांसमवेत रहातात. 

पंचपाळी हौद : हा राजवाड्याजवळच आहे. मधोमध मोठे चौरस कारंजे असलेला हौद आणि त्याच्या चारही बाजूला आयताकार हौद अशी याची रचना आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेला हौद वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे. याच्यावर आता मंदिर उभारण्यात आले आहे. 

मंगळवार तळे : राजवाड्याच्या पश्चिमेस हे सुंदर तळे असून, खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. बहुधा सातारा शहरात अनेक वाडे बांधले गेले, त्यासाठी यातून दगड काढले असावेत. त्यातच कल्पकतेने साठवण तलाव निर्माण केला असावा. 

फुटके तळेकमानी हौद : इ. स १८४०मध्ये ‘कमानी हौद’ बांधण्यात आला. गुरुवार चौकातच उत्तर बाजूस मुख्य रस्त्यावर कमानी आहेत. सात कमानी आहेत. मुख्यत्वेकरून जनावरांच्या पाण्याची सोय व्हावी, या हेतूने हा हौद बांधला होता. यात रात्रीच्या वेळी कारंज्यावर प्रकाशझोत टाकून पाण्याचे फवारे सोडले जातात. त्यामुळे सुंदर रंगीत व थंड वातावरण निर्माण होते. याचे बांधकाम दगडांच्या साह्याने करण्यात आले आहे. 

फुटके तळे : सोमवार पेठेमध्ये हा तलाव आहे. इमारतीच्या बांधकामासाठी दगड काढण्यासाठी एका ओढ्याच्या काठावर खाण काढण्यात आली होती. त्याचेच तलावात रूपांतर करण्यात आले. आता या तलावामध्ये गणपतीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे व ते शहरातील एक आकर्षण झाले आहे. फुटक्या तळ्याच्या पूर्वेकडून अदालतवाड्याकडे एक रस्ता गेला आहे. तेथे अनेक सरदार, मंत्री, कारकून राहत असत. त्यापैकी तिथे असलेल्या नातूवाड्यात नाना फडणवीसांचा जन्म झाला असावा. तसा कागदोपत्री उल्लेख नाही; पण नाना फडणवीसांचे वडील वेळासहून सातारा येथे आल्यावर नातूवाड्यात राहिले होते. अर्थात नातूवाडा आता अस्तित्वात नाही. नाना फडणवीस व नानासाहेब पेशवे यांना मुतालिकीच्या शिक्षणाची व्यवस्था शाहू महाराज यांनी केली होती. 

महादरे तलाव

महादरे तलाव :
सातारा शहराच्या पश्चिमेला यवतेश्वर डोंगराच्या पायथ्याशी प्रतापसिंह महाराजांनी हा तलाव बांधला. शहराच्या पश्चिम भागातील काही भागाला यातून अद्यापही पाणीपुरवठा होतो. याची लांबी ८७ मीटर, रुंदी ८६ मीटर व खोली १० मीटर आहे. हा तलाव संपूर्ण घडीव दगडांनी बांधून घेण्यात आला आहे. या तलावाच्या दक्षिणेला हत्ती जलाव आहे. 

चार भिंती स्मारक

चार भिंती स्मारक :
सातारा शहर व पूर्वेकडे कोडोली, माहुलीपर्यंत वाढलेल्या नवीन वस्तीच्या मधोमध हे स्मारक आहे. येथून सातारचे विहंगम दृश्य दिसते. दोन्ही बाजूंनी आता रस्त्याची सोय झाली आहे. अजिंक्यताऱ्यालगत असलेल्या टेकडीवर चार भिंती येथे १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात आहुती देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ स्मारक स्तंभ उभारण्यात आला आहे. हा स्तंभ ३० फूट उंचीचा असून, त्याभोवती चारही बाजूंना १० फूट उंचीच्या चार भिंती व त्याभोवती छोटी तटबंदी आहे. या ठिकाणी झाशीची राणी लक्ष्मीबाई व प्रतापसिंह महाराजांचे वकील रंगो बापूजी गुप्ते यांचे अर्धपुतळे आहेत. स्तंभाच्या डाव्या बाजूवर १८५७च्या धामधुमीतील हिंदुस्तानचा नकाशा, तर उजव्या बाजूला भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील ठळक घटनांची नोंद दर्शविण्यात आली आहे. 

चार भिंती स्मारक

ग्रामदैवत ढोल्या गणपतीछत्रपती शिवाजी संग्रहालय : या ठिकाणी दुर्मीळ ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा संग्रह आहे. हे वस्तुसंग्रहालय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहे. या संग्रहालयात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू, साधने, शस्त्रे आणि पोशाखांचा संग्रह आहे. येथे भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राणे, चिलखते, तलवारी, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, किल्ल्याचा दरवाजा फोडण्यासाठी हत्तीकरवी वापरावयाचे शस्त्र, सोनसळी, पडदे, गुप्तीचे प्रकार, रणशिंग, बिचवा, लहान मुलांची खेळणी, पालखीच्या दांड्यावरील मानचिन्ह, वाघनखे, बंदुकांचे प्रकार, दारूच्या पुड्याचा शिगाडा, संगिनी, पिस्तुले असे विविध प्रकारचे युद्धसाहित्य व साधने मांडलेली आहेत. वस्त्र विभागामध्ये अंगरखे, जरीबुट्टीचे कपडे, साड्या, पैठणी, फेटे, बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान, अनेक प्रकारच्या पगड्या, शेले इत्यादी गोष्टी आहेत. तसेच येथे राघोबादादांची तलवारही आहे. या संग्रहालयामध्ये शिवाजी महाराजांची वंशावळ लावली आहे. सध्या हे संग्रहालय एसटी स्टँडसमोर असून, आता स्टँडच्या उत्तरेस अद्ययावत संग्रहालय उभे करण्यात आले आहे. 

ग्रामदैवत ढोल्या गणपती : या गणपतीचे मंदिर अदालतवाड्याच्या पुढे समर्थमंदिराजवळ आहे. हा गणपती आकाराने मोठा असल्याने भक्त आपल्या दैवताला ढोल्या गणपती म्हणतात. 

खिंडीतील गणपती

खिंडीतील गणपती श्री कुरणेश्वर मंदिर :
पहिले बाजीराव पेशवे यांचे मेहुणे कृष्णाजी चासकर यांनी १७२३मध्ये हे दगडी मंदिर बांधले. अजिंक्यताऱ्याच्या दक्षिण उतारावर बोगद्यापलीकडे जुन्या पुणे-सातारा रस्त्यावर हे सातारकरांचे श्रद्धास्थान आहे. हे आवडीने फिरायला जाण्याचे, सहलीचे ठिकाण आहे. दिवंगत भाऊकाका गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. तेथे आता आयुर्वेदीय वृक्ष उद्यान साकारत आहे. हे अत्यंत शांत व निसर्गरम्य ठिकाण आहे. 

शंकराचार्य मठ : शनिवार पेठेतील माची भागात हा मठ असून, येथे संस्कृत अध्ययन केले जाते. कांचीकामकोटीचे शंकराचार्य येथे मुक्कामाला असताना पंतप्रधान इंदिरा गांधी व राष्ट्रपती संजीव रेड्डी त्यांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले होते. येथून अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी मारुती मंदिरमार्गे बांधीव पायरी मार्ग आहे. अरुण गोडबोले यांनी पुढाकार घेऊन, देणग्या गोळा करून पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. 

शकुनी गणपती : गुरुवारपेठेत हे मंदिर असून, नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. 

पंचमुखी गणपतीगारेचा गणपतीपंचमुखी गणपती : अलीकडील काळातील हे टुमदार मंदिर असून, भारतातील पाच मुखे असलेल्या काही मोजक्या पंचमुखी गणपती मंदिरांपैकी एक आहे. पंचमुखी गणपतीच्या खालील बाजूस एक जुने मारुती मंदिरही आहे. 

गारेचा गणपती : चिमणपुरा पेठेत हे मंदिर असून या गणपतीला पेशव्यांनी सोन्याचा मुकुट दिला आहे. 

गजानन महाराज मंदिर : दिवंगत भय्यासाहेब भुर्के यांनी या मंडळाच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. अनिल देशपांडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या साह्याने मंदिर पूर्णत्वास नेले. साताऱ्यात संत गजानन महाराजांचे असंख्य भक्त आहेत. त्यांनी वर्गणी काढून हे मंदिर सन १९९६मध्ये उभारले. या मंदिराची उभारणी होत असताना थोडीफार माझी सेवा रुजू करण्याची संधी मला मिळाली. मंदिराचे प्रारूप, संकल्पचित्र व उभारणी यामध्ये मला खारीचा वाटा उचलता आला, हे माझे भाग्य. 

गजानन महाराज मंदिर

गजानन महाराज मंदिर

साईबाबा मंदिर :
कोल्हापूर रस्त्यावर साईबाबा भक्तांनी देणगीतून हे मंदिर उभारले आहे. साई भक्त येथून दर वर्षी शिर्डीपर्यंत पायी दिंडी काढतात. तसेच अनेक सामाजिक उपक्रमही राबवितात. 

नटराज मंदिर

नटराज मंदिर :
कांचीकामकोटी येथील शंकराचार्य सातारा येथे मुक्कामास असताना त्यांच्या आशीर्वादाने शामण्णा शानभाग यांनी कृष्णानगर येथे दाक्षिणात्य पद्धतीच्या चार गोपुरे असलेल्या उत्तर चिदंबरम् (श्री नटराज) मंदिराची उभारणी केली. आज हे भाविकांचे व पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. 

बिरोबा मंदिर : कोडोली औद्योगिक वसाहतीत हे धनगर समाजाचे जुने देवस्थान असून, येथे विकासाची कामे चालू आहेत. हे ठिकाण निसर्गरम्य आहे. 

गेंडामाळ दत्तमंदिर : सातारा मोळाचा ओढा रस्त्यावर पश्चिमेला फर्लांगभर अंतरावर हे रम्य ठिकाण आहे. 

ध्यान मंदिर : गेंडामाळावर हे सुंदर, शांत श्रीराम मंदिर असून, परिसर खूप छान आहे. 

कोटेश्वर मंदिर : साताऱ्याच्या पश्चिमेला शुक्रवार पेठेत हे सुमारे २०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. श्रावणी सोमवारी, तसेच महाशिवरात्रीला येथे भक्तांची गर्दी असते. 

पेढ्याचा भैरोबा

पेढ्याचा भैरोबा :
साताऱ्याच्या पश्चिमेला दरे गावाच्या हद्दीत येवतेश्वरच्या डोंगरात हे देवस्थान आहे. देवळापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. अत्यंत हवेशीर, निसर्गरम्य ठिकाण असून, येथून सातारा शहराचे दर्शन होते. 

पारशी आग्यारी : साताऱ्यामध्ये पूर्वीपासून अनेक पारशी कुटुंबे राहत असून, सदरबझारमध्ये त्यांचे अग्निपूजा मंदिर आहे. जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत असलेले ठिकाणही आहे. 

भीमाबाई आंबेडकर समाधी : जरंडेश्वर नाक्याच्या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्रींची समाधी आहे. तेथे नव्याने स्मारक बांधण्याचे काम चालू आहे. 

चर्च : सदरबझारमध्ये वृक्षराजीत असलेले अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च आणि पोवई नाक्यावरील टिळक मेमोरियल चर्च अशी दोन चर्चेस आहेत.

महानुभाव मठ : महानुभव पंथाचे प्रणेते श्री चक्रधर स्वामी आहेत. इ. स. १९१२मध्ये स्व. बाबा मोतीवाले यांनी या मठाची स्थापना केली. 



साताऱ्यातील संस्था :

मराठा विद्याप्रसारक संस्था : रावबहादूर संभाजीराव दुदुस्कर यांनी आनंदराव कदम व मारुतराव देशमुख यांच्या सहकार्याने एक सप्टेंबर १९०७ रोजी मराठा विद्याप्रसारक मंडळाची स्थापना केली. शेतकरी, कामकरी वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून वसतिगृहाची स्थापना केली. या संस्थेला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी १४ एप्रिल १९३३ रोजी राणीसाहेबांबरोबर भेट दिली होती. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मातोश्री रहिमतपूरचे सरदार माने यांच्या कन्या असल्याने वसतिगृहाचे नामकरण महाराणी जमनाबाई बोर्डिंग असे करण्यात आले. संस्थेमार्फत कला, वाणिज्य महाविद्यालयही सुरू करण्यात आले. 

शिवाजी उदय मंडळ : सातारा येथील ही संस्था शारीरिक शिक्षण, कबड्डी, खोखो, मल्लखांब अशा देशी खेळांना प्रोत्साहन देणारी संस्था आहे. या संस्थेने अनेक नामवंत खेळाडू निर्माण केले. गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे दैनंदिन कार्यक्रम चालू असतात. अत्यंत शिस्तीने गणपती उत्सवात भाग घेणारी ही संस्था आहे. राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे आयोजन येथे केले जाते. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांची समाधी

रयत शिक्षण संस्था :
चार ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. सध्या पोवई नाक्यावरच संस्थेचे मुख्यालय असून, कर्मवीर भाऊराव पाटील यांची समाधी आहे. हे एक आदर्शवत स्मारक आहे. येथे विधी महाविद्यालय, जिजामाता अध्यापन पदविका विद्यालय, सयाजीराजे हायस्कूल व वसतिगृह आहे. संस्थेच्या एकूण शाळा ४३८ असून मुलींच्या शाळा २६ आहेत. इंग्रजी माध्यम शाळा सहा, महाविद्यालये ४२, आश्रम शाळा आठ, तर शेती शाळा १७ आहेत. संस्थेची ८० वसतिगृहे असून, मुलींची वसतिगृहे २९ आहेत. कर्मचारी संख्या १६ हजार १७२ असून, प्रशासकीय कार्यालये आठ आहेत. एकूण विद्यार्थी चार लाख ५४ हजार १६४ आहेत. या संस्थेचा एवढा मोठा वटवृक्ष महाराष्ट्रात पसरला आहे. 

कर्मवीरांचा वडाचा पार. डॉ.अनिल पाटील व विद्यार्थी.

हिंगणे शिक्षण संस्थेची रा. भि. काळे कन्या शाळा, डेक्कन एजुकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल, अनंत हायस्कूल, विवेकानंद शिक्षण संस्थेचे लालबहादूर शास्त्री कॉलेज व हायस्कूल अशा अनेक जुन्या, नव्या संस्था साताऱ्यात कार्यरत आहेत. 

क्रांतिस्मृती : या संस्थेतर्फे शारीरिक शिक्षण अध्यापक विद्यालय चालविले जाते.

अर्कशाळा : आयुर्वेदीय अर्कशाळा साताऱ्यात १९२६पासून कार्यरत आहे. स्वतः अॅलोपॅथीचे पदवीधर असलेले सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. एम. एन. आगाशे यांनी ही संस्था स्थापन केली. 

युनायटेड वेस्टर्न बँकयुनायटेड वेस्टर्न बँक : आता ही बँक आयडीबीआय बँकेत विलीन झाली आहे. त्या बँकेचे मुख्यालय सातारा येथे होते. साताऱ्यातील पहिली बहुमजली इमारत या बँकेची होती. या बँकेचे अस्तित्व ही सातारकरांच्या अभिमानाची गोष्ट होती. तिचे नाव पुसले गेले, याची खंत सातारकरांना राहिली आहे. 

युनियन क्लब : दादासाहेब करंदीकर, बळवंतराव सहस्रबुद्धे, दत्तोपंत चितळे असे कार्यकर्ते खंडेराव चिटणीस यांच्या घरी एकत्र जमून सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी विचारविनिमय करीत असत. ही जागा अपुरी पडू लागल्याने स्वतंत्र जागा घेऊन १८९७मध्ये युनियन क्लबची स्थापना करण्यात आली. 

इतर काही ठिकाणे : गोरा राम मंदिर, काळा राम मंदिर, खजिन्याची विहीर, मोती तळे मंगळाई, बोगद्याजवळील मारुती, शनी मारुती मंदिर, पुष्कर मंगल कार्यालयाच्या मागील कार्तिकस्वामी मंदिर, कलावतीदेवी मंदिर, खण आळीतील जैन मंदिर, शनिवार पेठेतील राममंदिर, कुबेर गणपती, काशीविश्वेश्वर मंदिर, गोलमारुती, शनिवार विठोबा, शाहू कलामंदिराजवळील विठोबा, राजवाड्याजवळील मारुती अशी अनेक देवळे येथे आहेत. 

कसे जाल? कोठे राहाल साताऱ्यात?

सातारा रेल्वेने, तसेच रस्तेमार्गाने जोडलेले आहे. दिल्ली, बेंगळुरू, मदुराई, मुंबई, जोधपूर, अहमदाबाद येथून रेल्वेने जाता येते. पुणे, कोल्हापूरपासून सुमारे दोन तासांत जाता येते. हे ठिकाण राष्ट्रीय हमरस्त्यावर आहे. जवळचा विमानतळ पुणे १२० किलोमीटर. संपूर्ण वर्षभर येथे येऊ शकता. सर्व मोसमांत पर्यटकांची वर्दळ असते. जेवणाखाण्याची, राहण्याची चांगली सोय आहे.

(या लेखासाठी साताऱ्यातील इतिहासप्रेमी छायाचित्रकार नरेंद्र जाधव यांनी अनेक जुने संदर्भ, तसेच छायाचित्रेही उपलब्ध करून दिली. माझी पत्नी सौ. नीलिमा हिचे माहेर साताऱ्यात असल्याने तिचाही या लेखासाठी हातभार लागला.) 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZYCBZ
 आपण सातारा शहर व त्याजवळील परिसराची माहिती नेमकी व आवश्यक माहिती दिली आहे. अभिनंदन .
एक सातारकर.1
 मस्त1
 Farach Sunder mahiti.1
 अप्रतिम माहिती1
 khup chhan mahiti......!1
 Shree Madhavraojee
Excellent article, good collection and very nicely explained.
Good, keep it up ! All the very best
Suhas Bhide
 A query : it was Satara which was selected as the Capital .
Why Satara ?
 A query : what was the route people took for travel between
between Satara and Pune , BEFORE the present road was built ?
Whose idea was it ?
Similar Posts
वैभवशाली साताऱ्याची सफर - भाग ५ ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेच्या कराडपर्यंतची पर्यटनस्थळे पाहिली. या भागात फलटण, खंडाळ्याचा फेरफटका.
वैभवशाली साताऱ्याची सफर - १० ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या नऊ भागांत आपण वैभवशाली साताऱ्याची सफर केली. त्या मालिकेतील आजच्या दहाव्या भागात माहिती घेऊ या महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन निसर्गरम्य अशा थंड हवेच्या ठिकाणांची.
वैभवशाली साताऱ्याची सफर – भाग ८ (वाई) ‘करू या देशाटन’ या सदराच्या आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील वाईमधील पर्यटनस्थळांची....
वैभवशाली साताऱ्याची सफर – भाग ६ ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण सातारा जिल्ह्यातील फलटण व आसपासचा परिसर पाहिला. आजच्या भागात पाहू माण आणि खटाव तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनस्थळे. त्यात शिखर शिंगणापूर, गोंदवले आदी ठिकाणांचा समावेश आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language